भूमाफियांवर आता ‘मोक्का’चा फास? अतुल सावे यांची मागणी; बनावट जमीन व्यवहारांवर सरकारचा मोठा निर्णय
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि १० :- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव परिसरातील बनावट कागदपत्रांच्या आधारे होणाऱ्या जमीन व्यवहारांबाबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भूमाफियांविरोधात कठोर कारवाई करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत बनावट खरेदीखते, खोटी वारस प्रमाणपत्रे, दस्तऐवजांमध्ये फेरफार, दुबार विक्री तसेच खोट्या कागदपत्रांच्या आधारे नागरिकांच्या मालमत्ता बळकावण्याचे अनेक प्रकार समोर आल्याची माहिती देण्यात आली. विशेषतः परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मालमत्तांची फसवणूक झाल्याच्या घटनांवरही गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
यावेळी मंत्री अतुल सावे यांनी या गंभीर प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून त्यांच्याविरोधात मोक्का (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली.
महसूल, नोंदणी आणि पोलीस विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा, संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि भूमाफियांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करावे, असे स्पष्ट निर्देश बैठकीत देण्यात आले.
सामान्य नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण, जमीन व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणि शासनावरील जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. भूमाफिया आणि फसवणूक करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
👉 जमीन व्यवहारांतील फसवणुकीविरोधात सरकारची ही मोठी मोहीम कितपत प्रभावी ठरते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.