हज यात्रेकरूंच्या सुविधांचा सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यांनी घेतला आढावा; हज हाऊसची केली पाहणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १२ :- अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिव डॉ. माधवी खोडे चवरे यांनी किल्ले अर्क परिसरातील व्ही.आय.पी. रोड येथील हज हाऊसला भेट देऊन तेथील विविध सुविधांची पाहणी केली. हज यात्रेकरूंसाठी उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, प्रशासकीय कामकाज आणि आगामी हज यात्रेच्या नियोजनाचा आढावा घेणे हा या भेटीचा प्रमुख उद्देश होता.
डॉ. माधवी खोडे चवरे यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाने हज हाऊसमधील पायाभूत सुविधा, निवास व्यवस्था तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. हज यात्रेकरूंना अधिक चांगल्या सुविधा आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसुविधांबाबत आवश्यक ती दक्षता घेण्याच्या सूचना डॉ. चवरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. हज यात्रेच्या अनुषंगाने नियोजनबद्ध प्रशासकीय व्यवस्था आणि सुविधांची गुणवत्ता यावर या पाहणीदरम्यान भर देण्यात आला.
या दौऱ्यात अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या आयुक्त प्रतिभा इंगळे, महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी फयाझ खान, उपायुक्त ख्वाजा अश्रफ, प्रतिभा चौधरी, जुनेद सय्यद, कक्ष अधिकारी खदिजा नाईकवाडे, लेखा अधिकारी शोएब मुसा शेख आणि रशीद शेख यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हज यात्रेकरूंना सुरक्षित, सुसज्ज आणि सोयीस्कर व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी हज हाऊसमधील सुविधांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण ठरली.
महाराष्ट्र वाणी/ सत्यासाठी निर्भीड / जनतेसाठी समर्पित