सुहास शिरसाठ की गणेश लोंखडे; औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक : तब्बल 98.90 टक्के मतदान
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) , दि. १८ : औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील लोकप्रतिनिधींनी मोठ्या संख्येने मतदानात सहभाग नोंदवत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी अधोरेखित केली. या निवडणुकीत एकूण 637 मतदारांपैकी 630 जणांनी मतदानाचा हक्क बजावला असून 98.90 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
मतदार यादीतील 311 महिला आणि 326 पुरुष मतदारांपैकी 308 महिला व 322 पुरुष मतदारांनी मतदान केले. महिला मतदानाचा टक्का 99.04, तर पुरुष मतदानाचा टक्का 98.77 इतका राहिला.
सिल्लोड, कन्नड, वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री, गंगापूर, जालना, अंबड आणि परतूर या केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. छत्रपती संभाजीनगर केंद्रात 137 मतदारांपैकी 132 जणांनी मतदान करत 96.35 टक्के, पैठण येथे 97.22 टक्के, तर भोकरदन येथे 97.62 टक्के मतदान नोंदविण्यात आले.
मतदान प्रक्रिया सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत शांततेत आणि सुरळीत पार पडली. प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विविध मतदान केंद्रांवर मतदारांचा उत्साह दिसून आला.
आता मतदानानंतर उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, 22 जुन निकालाच्या दिशेने सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी मतमोजणीत कोणाला विजयाची संधी मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे.
महायुतीचे उमेदवार हे शंभर टक्के विजयी होतील असा दावा मंत्री अतुल सावे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केला आहे.
लोकशाहीच्या या महत्त्वाच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधींनी दाखविलेला उत्स्फूर्त सहभाग हा मतदारसंघासाठी सकारात्मक संदेश मानला जात आहे.
अधिक ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी वाचत राहा — महाराष्ट्र वाणी.