"सामान्यांच्या सेवेसाठी समर्पित: उपमुख्यमंत्री शिंदे यांचं चार्टर्ड विमान ठरलं जीवनदान"
महाराष्ट्र वाणी न्युज
जळगाव (प्रतिनिधी) दि७ जून :- "सामान्य माणसासाठी समर्पित" ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा केवळ एक घोषणा नसून, कृतीतून सिद्ध होत आहे. याचं एक ज्वलंत उदाहरण नुकतेच समोर आले. संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त शुक्रवारी मुक्ताईनगरला आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला परतत असताना त्यांच्या उड्डाणाला थोडा उशीर झाला. आणि याच उशीराने एका मायभगिनीच्या जीवनात आशेचा नवा किरण निर्माण केला.
शीतलताई पाटील, जळगाव जिल्ह्यातील रहिवासी, या गंभीर किडनी विकाराने ग्रस्त होत्या आणि किडनी ट्रान्सप्लांटसाठी मुंबईला जाणे त्यांच्यासाठी अत्यंत आवश्यक होते. पतीसोबत त्या विमानाने मुंबईला निघाल्या होत्या, पण दुर्दैवाने त्यांचे नियोजित विमान चुकले. हा विषय आरोग्यमंत्री गिरीश महाजन यांच्या लक्षात आला आणि त्यांनी त्वरित ही माहिती उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
मात्र, यानंतर जे घडलं ते भावनिक आणि प्रेरणादायी ठरले. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोणताही विलंब न करता आपल्या चार्टर्ड विमानातून शीतलताई आणि त्यांच्या पतीसह त्यांना मुंबईला पाठवण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे, तर प्रवासादरम्यान शिंदे साहेबांनी शीतलताईंची आस्थेने विचारपूस केली आणि मुंबईत पोहोचल्यावर विशेष रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या मदतीमुळे शीतलताईंची जीवनावश्यक शस्त्रक्रिया वेळेत पार पडली. भावनिक होत त्यांनी शिंदे साहेबांचे आभार मानले आणि अशा कठीण क्षणी मदतीला धावून आलेल्या या "भाऊ"ला आपल्या जीवनातील देवदूतच म्हटलं.
उपमुख्यमंत्री शिंदे यांचे माणुसकीवर आधारित आणि जमिनीशी जोडलेले नेतृत्व हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतं. जनतेशी नाळ जुळलेली असूनही ते कुठेही अतिरेकी प्रचार न करता कृतीतून माणुसकीचे दर्शन घडवत असतात.
या प्रसंगातून संपूर्ण महाराष्ट्राने पुन्हा एकदा पाहिले की, शिंदे साहेब केवळ एक राजकारणी नाहीत, तर खऱ्या अर्थाने "डेडिकेटेड टू कॉमन मॅन" आहेत