संघर्ष, निष्ठा आणि कष्टांना मोठं फळ; इद्रिस मुलतानी यांची राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती, राज्यमंत्री दर्जाही जाहीर!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २९ :- शून्यातून स्वतःची ओळख निर्माण करत पक्षाशी कायम इमानदारी, निष्ठा आणि अदब राखून रात्रंदिवस कार्य करणारे महाराष्ट्र भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुस्लिम समाजाच्या राज्यस्तरीय अभ्यास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना राज्यमंत्री दर्जाही बहाल करण्यात आला आहे. या नियुक्तीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्य करत असताना इद्रिस मुलतानी यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सामान्य कार्यकर्त्यांपासून नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. पक्षनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी कायम जोडलेले राहण्याची त्यांची कार्यपद्धती यामुळे त्यांना ही मोठी जबाबदारी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
संघर्ष करणाऱ्यांचा प्रवास कधीच सोपा नसतो. विरोधकांनी कितीही अडथळे निर्माण केले किंवा मागे खेचण्याचा प्रयत्न केला तरी जनतेचा विश्वास, प्रामाणिक कार्य आणि पक्षनिष्ठा यांच्यासमोर प्रत्येक कट निष्फळ ठरतो, अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
ही नियुक्ती केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून निष्ठा, कष्ट आणि समर्पणाचा विजय असल्याची भावना भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा तसेच सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे मंत्री, आमदार आणि विविध पदाधिकाऱ्यांनी इद्रिस मुलतानी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
— संघर्षातून उभा राहिलेला प्रवास जेव्हा यशाच्या शिखरावर पोहोचतो, तेव्हा तो अनेकांसाठी प्रेरणा ठरतो!