'विश्वासाची परतफेड' : ग्रामीण पोलिसांनी शोधून दिले 130 हरवलेले मोबाईल; पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते नागरिकांकडे सुपूर्द
सुमारे 22.74 लाख रुपयांचे मोबाईल अवघ्या महिनाभरात शोधले; अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू, CEIR प्रणालीचा वापर करण्याचे आवाहन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.१७ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांचा विश्वास जिंकणारी उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत हरवलेले व गहाळ झालेले 130 मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले. सुमारे 22 लाख 73 हजार 972 रुपये किमतीच्या या मोबाईलचे वितरण शुक्रवारी 'विश्वासाची परतफेड' या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले.
कैलासशिल्प सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्यासह 200 हून अधिक नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण पोलिसांनी 13 जून ते 17 जुलै 2026 या कालावधीत अत्याधुनिक तांत्रिक तपास, IMEI ट्रॅकिंग, Central Equipment Identity Register (CEIR) प्रणाली, सायबर विश्लेषण तसेच विविध जिल्ह्यांतील पोलीस यंत्रणांच्या समन्वयातून हरवलेले मोबाईल शोधून काढले. यात 1 ॲपल, 17 ओप्पो, 30 विवो, 10 सॅमसंग, 17 रियलमी, 28 रेडमी तसेच इतर कंपन्यांचे 27 मोबाईल असा एकूण 130 मोबाईलचा समावेश आहे.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरिकांची हरवलेली मालमत्ता परत मिळवून देणे ही लोकाभिमुख आणि विश्वासार्ह पोलीसिंगची ओळख असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शासनाच्या प्रत्येक उपक्रमाचा केंद्रबिंदू नागरिक असल्याचे सांगत, हरवलेले मोबाईल शोधून मूळ मालकांच्या ताब्यात देण्याचा ग्रामीण पोलिसांचा उपक्रम स्तुत्य आणि नागरिकाभिमुख असल्याचे गौरवोद्गार काढले.
पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी मोबाईल हरवल्यास नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार किंवा ई-एफआयआर नोंदवून CEIR पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन केले. CEIR प्रणालीमुळे हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईलचा IMEI क्रमांक राष्ट्रीय स्तरावर ब्लॉक केला जातो. त्यामुळे मोबाईलचा गैरवापर रोखता येतो आणि तो कोणत्याही नेटवर्कवर वापरात आल्यास त्याचा मागोवा घेणे शक्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
भावनिक क्षण ठरला मोबाईल परत मिळण्याचा
कार्यक्रमात अनेक नागरिकांना आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्यानंतर भावना अनावर झाल्या. मोबाईलमध्ये साठवलेले कुटुंबीयांचे संपर्क, महत्त्वाची कागदपत्रे, छायाचित्रे आणि आठवणी पुन्हा मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. नागरिकांनी ग्रामीण पोलिसांचे आभार मानत हा केवळ मोबाईल परत मिळण्याचा नव्हे, तर पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ करणारा अनुभव असल्याची भावना व्यक्त केली.
ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना मोबाईल हरवल्यास वेळ न दवडता तक्रार नोंदवून IMEI क्रमांक जतन ठेवावा आणि CEIR पोर्टलवर तत्काळ नोंदणी करावी, असे आवाहन केले. वेळेत तक्रार नोंदवल्यास मोबाईल शोधण्याची शक्यता अधिक वाढत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.