विप्रोचा वाळूजमधील प्रकल्प १० डिसेंबरपासून बंद होणार; उत्पादन खर्च आणि घटती मागणी कारणीभूत
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- वाळूज औद्योगिक वसाहतीतील विप्रो एंटरप्रायझेसचा प्रकल्प १० डिसेंबर २०२६ पासून बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. पारंपरिक लाइटिंग उत्पादनांची मागणी कमी होणे, एलईडी तंत्रज्ञानाचा वाढता प्रसार तसेच उत्पादन आणि दैनंदिन कामकाजाचा खर्च वाढणे, ही या निर्णयामागील प्रमुख कारणे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
बदलत्या बाजारपेठेतील परिस्थितीमुळे पारंपरिक प्रकाशयोजना उत्पादनांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. त्यातच उत्पादन खर्च आणि ऑपरेटिंग खर्चात वाढ झाल्याने वाळूजमधील हा प्रकल्प सुरू ठेवणे आव्हानात्मक बनले आहे. प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी कंपनीने गेल्या काही वर्षांत विविध पर्यायांचा विचार केला. मात्र, उपलब्ध पर्याय आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य ठरू शकले नाहीत, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, प्रकल्प बंद होण्याच्या निर्णयामुळे संबंधित कर्मचारी, कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या परिणामांची कंपनीने दखल घेतली आहे. या प्रक्रियेत लागू असलेल्या कायदेशीर तरतुदींचे पालन केले जाईल, तसेच कर्मचारी, कामगार संघटना आणि संबंधित सरकारी अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी भूमिका कंपनीने स्पष्ट केली आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाले असून, कंपनीकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातात, याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित