राजनगर-मुकुंद नगर अंडरपासचा मार्ग मोकळा होणार? खासदार कल्याण काळेंची रेल्वे-मनपा अधिकाऱ्यांसह पाहणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २१ :- राजनगर आणि मुकुंद नगर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावित रेल्वे अंडरपासच्या जागेची खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या उपस्थितीत रेल्वे विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त स्थळ पाहणी केली.
या परिसरातून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, कामगार आणि विद्यार्थी ये-जा करतात. रेल्वे मार्गामुळे परिसरातील वाहतुकीवर परिणाम होत असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी अंडरपास उभारण्याच्या प्रस्तावावर तांत्रिक पाहणी करण्यात आली.
पाहणीदरम्यान रेल्वे आणि मनपा अधिकाऱ्यांनी प्रस्तावित जागेचा नकाशा, उपलब्ध रुंदी तसेच विविध तांत्रिक बाबींची माहिती घेतली. अंडरपासच्या कामासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रियेबाबतही चर्चा करण्यात आली.
नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी कामाला गती देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार डॉ. कल्याण काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंडरपासचा प्रश्न मार्गी लागल्यास राजनगर-मुकुंद नगर परिसरातील नागरिकांच्या वाहतुकीची मोठी समस्या दूर होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित