रमाई आवास योजनेच्या पहिल्या हप्त्यात दुप्पट वाढ; लाभार्थ्यांना आता मिळणार ५० हजार रुपये : पालकमंत्री संजय शिरसाट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३० :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. राज्याचे गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. घरबांधणीच्या प्रारंभिक टप्प्यासाठी दिला जाणारा २५ हजार रुपयांचा पहिला हप्ता वाढवून ५० हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या बांधकाम खर्चामुळे कमी रकमेत घराचे काम सुरू करणे कठीण होत असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
योजनेबाबत लाभार्थ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी लाभार्थ्यांची यादी सभागृहाबाहेर प्रसिद्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही शिरसाट यांनी सांगितले. तसेच, दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अद्ययावत लाभार्थी यादी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले असून समाजकल्याण विभाग आणि महानगरपालिका यांच्यात अधिक समन्वयाने काम केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.
गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आपल्या भाषणात प्रत्येक कुटुंबाला स्वतःचे घर मिळावे, ही केंद्र सरकारची भूमिका असल्याचे सांगितले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने प्रभावी अंमलबजावणी करावी, असे त्यांनी आवाहन केले.
महापौर समीर राजूरकर यांनी रमाई आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी स्वतंत्र समन्वय समिती स्थापन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. या समितीमार्फत लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि विविध टप्प्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. घरबांधणीचे काम सुरू होताच पुढील हप्ते वेळेत मिळावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी प्रास्ताविकात रमाई आवास योजनेची अंमलबजावणी पारदर्शक आणि न्याय्य पद्धतीने केली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला उपमहापौर राजेंद्र जंजाळ, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीचे सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक त्र्यंबक तुपे, नगरसेविका हर्षदा शिरसाट आणि कीर्ती शिंदे, अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील व कल्पिता पिंपळे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.