मालमत्ता कर थकबाकीदारांवर मनपाचा बडगा; कचरा संकलन बंद, नळजोडणी तोडण्याचा इशारा!
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- मालमत्ता कराची थकबाकी न भरणाऱ्या नागरिकांविरोधात छत्रपती संभाजीनगर महापालिकेने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांच्या घरातील कचरा संकलन बंद करण्यासह पाणीपुरवठ्याची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई केली जाणार आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांच्या मालमत्तांवर बोजा चढवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत.
शहरातील मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी महापालिकेने आता कडक भूमिका घेतली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, शहरात एकूण ३ लाख २६ हजार मालमत्ता असून, त्यापैकी तब्बल १ लाख ६७ हजार मालमत्ताधारकांकडे कराची थकबाकी आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसूल वसुलीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत महापालिकेला मालमत्ता करातून केवळ ८७ कोटी रुपयांची वसुली करता आली आहे. दुसरीकडे, मार्चअखेरपर्यंत ४०० कोटी रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी थकबाकीदारांकडून वसुली करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.
वसुलीत हलगर्जी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही इशारा
मालमत्ता कर वसुलीच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही आयुक्त अमोल येडगे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी संबंधित विभागांना अधिक सक्रिय व्हावे लागणार आहे.
महापालिकेच्या या निर्णयामुळे मालमत्ता कर थकबाकीदारांचे धाबे दणाणण्याची शक्यता आहे. कराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी थकीत रक्कम भरावी, यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जात आहेत.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित