‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!’ या घोषवाक्यासह उद्धव ठाकरेंचा १७ सप्टेंबरला एल्गार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १५ :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्याच्या रखडलेल्या विकासकामांविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली १७ सप्टेंबर २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडाव्यापी भव्य धरणे जनआंदोलन करण्यात येणार आहे.
शिवसेना नेते, आमदार तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या संयोजकतेखाली ‘मराठवाड्याचा विकास… तुमसे ना हो पायेगा!’ या घोषवाक्याखाली हे जनआंदोलन सुरू आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी करण्यात आलेल्या घोषणा, रखडलेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, उपनेते सुभाष पाटील, लक्ष्मणराव वडले, बबनराव थोरात, राज्य संघटक चेतन कांबळे, आमदार राहुल पाटील, कैलास पाटील आणि प्रवीण स्वामी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी उद्धव ठाकरे १६ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजता हुतात्म्यांना अभिवादन करणार आहेत.
मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष, रखडलेली कामे आणि शासनाकडून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी हे आंदोलन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. या आंदोलनात मराठवाड्यातील शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, महेश नळगे, गणेश वरेकर, उल्हास गिराम, रणजीत पाटील, बालाजी रेड्डी, ज्योतिबा खराटे, भुजंग पाटील, बबन बारसे, संदेश देशमुख, गोपू पाटील, रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, महानगर प्रमुख विवेक नावंदर व प्रकाश मारावर यांनी केले आहे.