मनपा नारेगाव शाळेत वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम; विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २८ : महानगरपालिका प्राथमिक व हायस्कूल, नारेगाव येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत विविध प्रकारची झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
कार्यक्रमाला छत्रपती संभाजीनगर पोलीस दलाच्या दामिनी पथकाची विशेष उपस्थिती लाभली. दामिनी पथकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत महिला व बालसुरक्षेबाबत जनजागृती केली. तसेच पर्यावरणाचे संरक्षण ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचा संदेशही दिला.
यावेळी विस्तार अधिकारी श्रीमती खान रईसा बेगम यांनी विद्यार्थ्यांना झाडांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व समजावून सांगितले. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक झाड लावून त्याची नियमित काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. जुबेर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आला. केंद्रीय मुख्याध्यापिका मापारी मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत पर्यावरण संरक्षणासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व, झाडांचे संगोपन, पाणी संवर्धन आणि स्वच्छ पर्यावरण राखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण करून "झाडे लावा, झाडे जगवा" हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून, भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प त्यांनी केला.