मनपा आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली? सिल्लेखान्यात उघडे खड्डे; मोठ्या दुर्घटनेची भीती!

प्रभाग क्र. १६ आणि १७ मधील नागरिकांचा जीव धोक्यात; AIMIM कडून झोन क्र. २ च्या उपअभियंत्यांना निवेदन

मनपा आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली? सिल्लेखान्यात उघडे खड्डे; मोठ्या दुर्घटनेची भीती!
मनपा आयुक्तांच्या आदेशालाही केराची टोपली? सिल्लेखान्यात उघडे खड्डे; मोठ्या दुर्घटनेची भीती!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- शहरातील प्रभाग क्रमांक १६ आणि १७ मधील सिल्लेखाना परिसरात महानगरपालिकेच्या अपूर्ण विकासकामांमुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. झोन क्रमांक २ कार्यालयासमोरच विविध ठिकाणी खोदकाम करून ते अर्धवट सोडण्यात आल्याने मोठमोठे खड्डे उघडे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे परिसरातील नागरिकांसह लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, एखादी गंभीर दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सिल्लेखाना परिसरात मदरसा आणि धार्मिक स्थळे असल्याने येथे नागरिकांची तसेच लहान मुलांची नेहमीच वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्यांवरील उघडे खड्डे धोकादायक ठरत आहेत. विकासकामांच्या नावाखाली खोदकाम करण्यात आले; मात्र संबंधित कामे पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, या कामांसाठी निधी मंजूर असतानाही झोन क्रमांक २ कार्यालयासमोरील कामे पूर्ण होत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांनी स्वतः या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती आणि काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर AIMIM औरंगाबाद शहराध्यक्ष नासेर सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी झोन क्रमांक २ च्या उपअभियंत्यांना निवेदन दिले. खोदलेल्या ठिकाणी तातडीने माती टाकून खड्डे बुजवावेत, तसेच रखडलेली विकासकामे त्वरित सुरू करून पूर्ण करावीत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी AIMIM औरंगाबाद मध्य विधानसभा अध्यक्ष जिशान देशमुख, मध्य विधानसभा कार्याध्यक्ष मुसेफ कुरैशी, प्रभाग अध्यक्ष समीर कुरैशी यांच्यासह AIMIM औरंगाबाद शहरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

आता तरी प्रशासन जागे होणार का?

झोन क्रमांक २ कार्यालयासमोरच अशी परिस्थिती असेल, तर इतर भागांतील अपूर्ण कामांची स्थिती काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वीच महानगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन खड्डे बुजवावेत आणि रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात येत आहे. l