मतदारांसाठी महत्त्वाची बातमी! नाव नोंदणी, दुरुस्ती आणि वगळणीसाठी १२ ऑक्टोबर अंतिम मुदत; १० व ११ ऑक्टोबरला विशेष शिबिरे
मुंबई दि ९ :- राज्यातील मतदार यादी अधिक अचूक करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नाव नोंदणी, मतदारांच्या तपशिलात दुरुस्ती आणि नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करता यावे, यासाठी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील मतदान केंद्रांवर विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
लाखो मतदारांचे अर्ज दाखल
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाची प्रक्रिया सुरू आहे. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत नमुना-६ अंतर्गत ७ लाख १९ हजार ३८२ अर्ज प्राप्त झाले आहेत.
याशिवाय, मतदार यादीतील नोंदी दुरुस्त करण्यासाठी नमुना-८ अंतर्गत ३ लाख ९९ हजार ९२५ अर्ज, तर मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना-७ अंतर्गत १८ हजार ७४८ अर्ज दाखल झाले आहेत.
नवमतदारांसाठीही महत्त्वाची संधी
१ ऑक्टोबर २०२६ या अर्हता दिनांकापर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले नवमतदार तसेच पात्र असूनही प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या नागरिकांना नमुना-६ भरून नाव नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे. अर्जासोबत आवश्यक घोषणापत्र आणि संबंधित कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे.
अर्ज संबंधित मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडे प्रत्यक्ष सादर करता येतील. तसेच १० आणि ११ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विशेष शिबिरांमध्येही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
नोटीस मिळालेल्या मतदारांनाही कागदपत्रे सादर करता येणार
मागील विशेष सखोल पुनरीक्षणातील नोंदींशी जुळवणी न झाल्यामुळे (नो मॅपिंग) किंवा नोंदींची जुळवणी होऊनही तार्किक विसंगती (लॉजिकल डिस्क्रिपन्सी) आढळल्यामुळे नोटीस मिळालेल्या मतदारांनाही विशेष शिबिरांमध्ये संबंधित कागदपत्रे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने नोटिशीत नमूद केलेल्या १३ प्रकारच्या कागदपत्रांपैकी आवश्यक दस्तऐवज उपलब्ध नसल्यास, परिस्थितीनुसार अन्य वैध कागदपत्रेही सादर करता येतील. यासाठी बीएलओ ॲपमध्ये ‘एनी अदर डॉक्यूमेंट्स’ हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
अंतिम मुदत चुकवू नका!
मतदार यादीतील नावाची नोंद, तपशिलातील दुरुस्ती किंवा नाव वगळण्यासंदर्भातील अर्ज १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी १० आणि ११ ऑक्टोबर रोजी आपल्या मतदान केंद्रावरील विशेष शिबिरांना भेट देऊन आवश्यक अर्ज व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित