एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! प्रत्येकी १० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! प्रत्येकी १० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! प्रत्येकी १० हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

मुंबई दि ५ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) तब्बल ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. प्रत्येक पात्र अधिकारी व कर्मचाऱ्याला १० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचलही मिळणार आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५८ टक्क्यांवरून ६० टक्के करण्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

एसटी महामंडळातील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली. महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत असले, तरी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीचा आनंद हिरावून घेता येणार नाही, अशी ठाम भूमिका परिवहन मंत्र्यांनी यावेळी मांडली.

एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत घेऊन राज्यातील लाखो प्रवाशांना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त सानुग्रह अनुदान देणे ही केवळ औदार्याची बाब नसून त्यांच्या श्रमाचा सन्मान असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

या निर्णयामुळे एसटी महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. मात्र, कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, याला शासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन अथवा संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहनही परिवहन मंत्र्यांनी केले. कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावताना प्रवाशांना दर्जेदार सेवा देणे आणि एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे, या दोन्ही बाबींवर शासन आणि महामंडळ काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे आर्थिक संकटाचा सामना करणारे एसटी महामंडळ आणि दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी शासनाचा १६० कोटींचा निर्णय, यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा आहे.