भेंडाळा फाट्यावर गावठी कट्ट्यासह युवक जेरबंद; ग्रामीण पोलिसांची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि १४ :- छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टा (पिस्टल) बाळगणाऱ्या एका युवकाला अटक करून त्याच्याकडून शस्त्र व जिवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भेंडाळा गावाजवळ करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना १३ जून रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की, छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील भेंडाळा गावातील राधाकृष्ण हॉटेलसमोर एक व्यक्ती गावठी कट्टा घेऊन उभा आहे. माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथक रवाना करण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्या वेळी भेंडाळा फाटा परिसरात घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने रात्री १०.४५ वाजता संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव किशोर शिवनाथ जाधव (वय २८, रा. अब्दुलपूर, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले.
पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीत आरोपीच्या कमरेला एक स्टीलचा गावठी कट्टा (मॅगझीनसह) आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ४१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोउपनि महेश घुगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडींचा विश्वासार्ह आवाज!