भंगार बाजारातील 117 दुकानदारांच्या पुनर्वसनाची मागणी; नुकसानभरपाईसाठी एपीसीआर-एकता संघटनेचे आयुक्तांना निवेदन
जळगाव, दि. ६ :- भंगार बाजारातील 117 दुकानदारांचे सन्मानपूर्वक पुनर्वसन करावे, कारवाईदरम्यान झालेल्या नुकसानीची कायद्यानुसार भरपाई द्यावी आणि संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा विचार करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी असोसिएशन फॉर पीस अँड जस्टिस (एपीसीआर) महाराष्ट्र आणि एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने केली.
एपीसीआर महाराष्ट्रचे सचिव शाकीर शेख आणि एकता संघटनेचे संयोजक फारूक शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त आदित्य जीवने यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. यावेळी आयुक्त आणि शिष्टमंडळामध्ये सुमारे 35 मिनिटे सविस्तर चर्चा झाली.
भंगार बाजारातील 117 दुकानदारांच्या पुनर्वसनासोबतच कारवाईमध्ये दुकानांचे, मालाचे आणि व्यवसायाचे झालेले नुकसान, नगरविकास विभागाकडे प्रलंबित असलेले अपील, जळगाव सेशन कोर्टातील दावा तसेच औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या प्रकरणाची सद्यस्थिती याबाबत शिष्टमंडळाने आयुक्तांचे लक्ष वेधले.
पुनर्वसनासह नुकसानभरपाईची मागणी
117 दुकानदारांना तातडीने योग्य आणि सन्मानजनक पद्धतीने पुनर्वसनाची व्यवस्था करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. कारवाईदरम्यान झालेल्या आर्थिक नुकसानीचे कायद्यानुसार मूल्यांकन करून संबंधित दुकानदारांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
नगरविकास विभागातील प्रलंबित अपीलाचा निर्णय होईपर्यंत मानवी आणि न्याय्य दृष्टिकोनातून या प्रकरणाचा विचार करावा. तसेच जळगाव सेशन कोर्टातील दाव्याचा अंतिम निकाल आणि औरंगाबाद खंडपीठातील प्रकरणातील न्यायालयीन आदेश लक्षात घेऊनच पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
कायदेशीर कागदपत्रांची निष्पक्ष तपासणी करण्याची मागणी
संबंधित सर्व कायदेशीर कागदपत्रे आणि उपलब्ध नोंदींची पूर्ण व निष्पक्ष तपासणी केल्यानंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली. अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या या दुकानदारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह आणि त्यांच्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून कायद्याच्या चौकटीत पुनर्वसनाचा मार्ग काढावा, असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
‘न्याय केवळ कागदावर नव्हे, तर प्रत्यक्षात दिसावा’
आयुक्त आदित्य जीवने यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे सविस्तर ऐकून घेतले. कायद्याच्या चौकटीत आवश्यक ती कार्यवाही करण्यासोबतच मानवी दृष्टिकोनातून जे काही शक्य आहे, त्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
या प्रकरणाकडे केवळ दुकाने आणि जागेचा प्रश्न म्हणून न पाहता 117 कुटुंबांच्या रोजगाराचा आणि उदरनिर्वाहाचा प्रश्न म्हणून पाहावे, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
यावेळी एपीसीआरच्या वतीने शाकीर शेख, अॅड. हमजा मिर्झा, अॅड. कलीमुद्दीन शेख, जळगाव एपीसीआरचे आरिफ देशमुख, अॅड. जफर मिर्झा, तर एकता संघटनेच्या वतीने फारूक शेख, अनीस शाह, हाफिज रहीम पटेल, नजमुद्दीन शेख, रज्जाक पटेल, रहीम शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो : मनपा आयुक्त आदित्य जीवने यांच्या दालनात एपीसीआर आणि एकता संघटनेच्या शिष्टमंडळाची चर्चा. तसेच शाकीर शेख व फारूक शेख यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले.
अखलाख देशमुख — महाराष्ट्र वाणी न्यूज