ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया; घाटीतील न्यूरोसर्जरी डॉक्टरांचा मुतवल्ली विंगतर्फे सन्मान

ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया; घाटीतील न्यूरोसर्जरी डॉक्टरांचा मुतवल्ली विंगतर्फे सन्मान
ब्रेन ट्यूमरची यशस्वी शस्त्रक्रिया; घाटीतील न्यूरोसर्जरी डॉक्टरांचा मुतवल्ली विंगतर्फे सन्मान

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. २७ :- घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी न्यूरोसर्जरी विभागाच्या डॉक्टरांचा ऑल इंडिया उलमा बोर्ड मुतवल्ली विंगतर्फे भव्य सत्कार करण्यात आला. गरीब व गरजू रुग्णांना अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध करून देतानाच ब्रेन ट्यूमरसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.

मुतवल्ली विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष शेख फैसल मुजावर यांनी न्यूरोसर्जरी विभागाचे प्रमुख डॉ. सचिन गुठे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार केला.

यावेळी शाहबाजार येथील ५१ वर्षीय शेख मोहम्मद अब्दुल कादर यांनी कुटुंबीय व नातेवाईकांसह डॉक्टरांचे आभार मानले. त्यांच्या पत्नी रुबीना शेख आणि मुलगा अबू सुफियान यांनी घाटीतील डॉक्टरांनी अत्यंत अवघड ब्रेन ट्यूमरची शस्त्रक्रिया यशस्वी करून रुग्णाला नवजीवन दिल्याचे सांगितले.

कार्यक्रमात डॉ. सचिन गुठे, डॉ. भावना टाकळकर, डॉ. सैफ हमीद, डॉ. विजय मुंढे, डॉ. कृतिका गर्ग, डॉ. मनोज भुक्तर, डॉ. प्रणव पिसे, डॉ. मनीष वैद्य तसेच आयुष्मान योजनेचे डेटा एंट्री ऑपरेटर शेख अफरोज यांचा सन्मान करण्यात आला.

डॉ. सचिन गुठे यांनी सांगितले की, घाटी रुग्णालयात आता मेंदूशी संबंधित गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे आणि विभागाचे ओएसडी डॉ. सुधीर चौधरी यांच्या सहकार्याने या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यातील रुग्णांना कमी खर्चात तज्ज्ञ डॉक्टरांकडून २४ तास उपचार मिळत असून, नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मुतवल्ली विंगच्या महिला जिल्हाध्यक्ष फरजाना शाह, शहर महिला उपाध्यक्ष सईदा आपा, सूफी संत विंगच्या सुमन जाधव यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.