पेपरफुटीच्या संशयानंतर टीईटी परीक्षा पुढे ढकलली; राज्यभरातील उमेदवारांमध्ये संभ्रम
महाराष्ट्र वाणी
मुंबई, दि. २७ : राज्यभरात रविवारी (२८ जून) आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी परिसरात काही व्यक्तींना टीईटीच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित माहिती आधीपासून उपलब्ध असल्याचा संशय निर्माण झाला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी कारवाई करत तपास सुरू केला. प्राथमिक पडताळणीदरम्यान काही प्रश्न आणि अधिकृत प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांमध्ये साम्य असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत परीक्षा प्रक्रियेवर कोणताही प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये आणि उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
टीईटी परीक्षेची नवीन तारीख आणि पुढील माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी महाराष्ट्र वाणीसोबत राहा!