पहिले समजावले... मग दंड ठोकला! आयुक्त अमोल येडगे यांचा स्वच्छतेसाठी धडक ॲक्शन

पहिले समजावले... मग दंड ठोकला! आयुक्त अमोल येडगे यांचा स्वच्छतेसाठी धडक ॲक्शन

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३ :- शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित बनविण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रशासनाने आणखी एक कडक पाऊल उचलले आहे. महानगरपालिकेचे आयुक्त अमोल येडगे यांनी सकाळच्या नियमित जॉगिंगदरम्यान शहरातील स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनाची अचानक पाहणी करत रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर थेट कारवाईचा बडगा उगारला.

पाहणीदरम्यान रस्त्यावर कचरा टाकणारा एक नागरिक आढळून आला. यावेळी आयुक्तांनी संबंधित व्यक्तीला प्रथम कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व समजावून सांगत घरातील कचरा ओला, सुका, घरगुती घातक आणि सॅनिटरी अशा चार प्रकारांत वर्गीकरण करूनच महानगरपालिकेच्या घंटागाडीत देण्याचे आवाहन केले. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाईचे आदेश दिले.

महानगरपालिकेच्या झोन क्रमांक ५ पथकाने ‘क्लीन स्ट्रीट ॲप’च्या माध्यमातून ब्रिजवाडी चौक ते उत्तरानगरी, एमआयडीसी चिकलठाणा परिसरात कारवाई करत तब्बल ₹३ हजारांचा दंड वसूल केला.

याच पाहणीदरम्यान एक कर्मचारी धूम्रपान करताना आढळून आला. सार्वजनिक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी कामाच्या वेळेत अथवा इतर वेळी धूम्रपान करू नये, अशी समज देत संबंधित कर्मचाऱ्यास सुधारणा करण्याच्या उद्देशाने नोटीस बजावण्यात आली.

यावेळी आयुक्तांनी शहरातील स्वच्छता व्यवस्थापन, घंटागाड्यांमधून होणारे कचरा संकलन आणि वर्गीकरण व्यवस्थेची सविस्तर पाहणी केली. तसेच अधिकारी, कर्मचारी, आयईसी टीम आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांना नागरिकांमध्ये अधिक प्रभावी जनजागृती करून शंभर टक्के कचरा संकलन व वर्गीकरण सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.

महानगरपालिकेने नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकण्याचे आणि घरातील कचरा चार प्रकारांत वर्गीकृत करूनच घंटागाडीत देण्याचे आवाहन केले आहे.

स्वच्छ शहर ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे!