धोक्याचा डोंगर अखेर जमीनदोस्त! गुलमंडीतील जीर्ण इमारत पाडली; २५ अतिक्रमणे जेसीबीखाली
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर २४ जून :– गुलमंडीतील रंगारगल्ली परिसरात असलेली अत्यंत जीर्ण व धोकादायक इमारत आज अखेर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने जमीनदोस्त केली. मनपाच्या अनेक नोटीसांनंतरही दुर्लक्ष करणाऱ्या मालकावर कारवाई करत ही कारवाई मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. श्रीकांत यांच्या आदेशावरून करण्यात आली.
सदर इमारत मालक दूरचंद कल्लूराम मेघावाले यांची असून ती नगर भूमापन क्र. 4388, अंदाजे 12x15 आकाराची होती. ही इमारत पूर्णतः जीर्ण अवस्थेत असल्याने मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे पालिकेने वेळोवेळी दिलेल्या नोटिसा धुडकावणाऱ्या मालकाकडे आता थेट कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
प्रथम कारवाईला विरोध झाला तरी आयुक्तांचे आदेश समजावून सांगताच इमारत जमीनदोस्त करण्यात आली. इतकेच नव्हे तर रंगारगल्ली ते सिटी चौक ग्रीन हॉटेल व सिटी चौक पोलिस स्टेशन पर्यंत परिसरातील बेकायदेशीरपणे उभारलेले तब्बल २५ शेड व अतिक्रमण हटवण्यात आले. काही दुकानदारांनी पूर्वसूचना असूनही प्रतिसाद दिला नव्हता, त्यामुळे त्यांच्या दुकानांवर जेसीबी चालवण्यात आली.
ही मोठी कारवाई अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, संजय सुरडकर, सविता सोनवणे, तसेच अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद व त्यांच्या चमूकडून पार पाडण्यात आली. या मोहिमेत विद्युत विभाग, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव आणि जेसीबी चालकांचाही सहभाग होता.
महापालिकेने व्यापाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे की, उद्याही कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे सर्वांनी स्वखुशीने अतिक्रमण हटवावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.
🟠 "धोकादायक इमारतींना नाही थांबा – मनपाची जेसीबी थेट कारवाईच्या भूमिकेत!"
🟢 अशाच ठळक बातम्यांसाठी वाचत राहा – तुमचं आवडतं न्यूज पोर्टल!