दिव्यागांच्या आंदोलनामुळे मनपाचे मुख्य प्रवेशद्वार बंद; नियोजनाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय

दिव्यागांच्या आंदोलनामुळे मनपाचे मुख्य प्रवेशद्वार बंद; नियोजनाअभावी नागरिकांची मोठी गैरसोय

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), नझमोदीन काजी

दि. ६ : विविध मागण्यांसाठी अपंग बांधवांनी गुरुवारी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेवर मोर्चा काढत मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. आंदोलनादरम्यान सुरक्षा विभागाने मुख्य प्रवेशद्वार बंद केल्यामुळे कामानिमित्त आलेल्या नागरिकांना प्रवेश नाकारण्यात आला आणि परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

आंदोलन सुरू असताना मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स उभारण्यात आले. त्यामुळे वाहनधारकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागला. अनेक नागरिक वाहतूक कोंडीत अडकले, तर काहींना वेळेत कामे पूर्ण करता आली नाहीत.

महानगरपालिकेत विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. आंदोलनाचा आदर राखत नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी प्रवेशद्वार खुले ठेवणे किंवा वाहतुकीचे योग्य नियोजन करणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

या घटनेनंतर महानगरपालिका प्रशासन, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आंदोलन हाताळताना सर्वसामान्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रभावी व्यवस्था करण्यात आली नसल्याची चर्चा दिवसभर परिसरात सुरू होती.

अपंग बांधवांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे असले, तरी त्याचवेळी नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी योग्य नियोजन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. आता या प्रकरणावर महानगरपालिका आणि पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.