जिल्ह्यात स्वच्छता पंधरवडा प्रभावीपणे राबवा; ZP CEO मिन्नू पी.एम. यांचे आवाहन

17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरदरम्यान अभियान; पाणी साठवणूक टाक्या, विहिरी व पाणी स्रोतांची होणार स्वच्छता

जिल्ह्यात स्वच्छता पंधरवडा प्रभावीपणे राबवा; ZP CEO मिन्नू पी.एम. यांचे आवाहन
जिल्ह्यात स्वच्छता पंधरवडा प्रभावीपणे राबवा; ZP CEO मिन्नू पी.एम. यांचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १६ :- ग्रामीण भागातील नागरिकांना नियमित आणि शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2026 या कालावधीत स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम. यांनी केले आहे.

या स्वच्छता पंधरवड्यात गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या पाण्याच्या साठवणूक टाक्या, विहिरी आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच शाळा व अंगणवाडी केंद्रांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित परिसराचीही साफसफाई केली जाणार आहे.

अभियानादरम्यान पिण्याच्या पाण्याच्या विविध स्रोतांमधून पाण्याचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींनी पाणी भरण्याची ठिकाणे, टाक्या, पाणी स्रोत आणि त्यांचा परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, शाळा व अंगणवाडीतील पाण्याच्या टाक्या तसेच पाणीपुरवठ्याचे स्रोत यांची नियमित स्वच्छता करून पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र./पं.) राघवेंद्र घोरपडे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक साहेबराव चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेळके तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीने ग्रामपंचायतींना सहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित