जाफरगेट दर्गा परिसरात मनपाची मोठी कारवाई! पत्र्याचे शेड हटवले; महिला-अधिकाऱ्यांमध्ये वादावादी, पोलिस बंदोबस्तात कारवाई
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), 17 जून:
महाराष्ट्र वाणी न्युज ---- जाफरगेट येथील हजरत कादर ऑलिया दर्गा कब्रस्तानाशेजारी अनधिकृत शेड उभारणाऱ्या तिघांवर आज महानगरपालिकेने मोठी कारवाई करत अतिक्रमण हटवले. ही कारवाई पोलिस बंदोबस्तात करण्यात आली.
सदर ठिकाणी अंत्यविधीवेळी नागरिक जिथे थांबतात, बसतात त्या खुल्या जागेवर स्थानिक दोन महिला आणि एका पुरुषाने पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण केले होते. या संदर्भात महाराष्ट्र वक्फ मंडळाने 4 जून रोजी महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांना पत्र लिहून अतिक्रमण हटवण्याची विनंती केली होती.
प्रशासकांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त रमेश मोरे आणि अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद यांनी स्थळ पाहणी करून अहवाल सादर केला. त्यानुसार अतिक्रमणधारकांना नोटीसही बजावण्यात आली होती. मनपाने वारंवार समज देऊनही संबंधित व्यक्तींनी परवानगी न घेता शेड कायम ठेवले. उलट महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करत असल्याच्या तक्रारीही नोंदवण्यात आल्या.
शेवटी, 9x12 मीटर क्षेत्रातील हे शेड जेसीबीशिवाय मजूर आणि हातसाहित्याच्या मदतीने तोडण्यात आले. दरम्यान, क्रांती चौक पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
कारवाईदरम्यान सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, मजर अली, सागर श्रेष्ठ, रवींद्र देसाई, माजी सैनिक नागरी मित्र पथक यांचे सहकार्य लाभले.