छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा; शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा; शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करा; शहरवासीयांना शुद्ध व नियमित पाणी द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि १५ :- छत्रपती संभाजीनगर शहराला जायकवाडी प्रकल्पातून शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेली महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना विहित कालावधीत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुंबईतील 'वर्षा' निवासस्थानी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणांना कामाला गती देण्याचे आदेश दिले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, अर्धवट राहिलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, पाण्याच्या टाक्यांचे बांधकाम आणि शहरातील वितरण प्रणाली पूर्णत्वास न्यावी. शेवटच्या नागरिकापर्यंत नियमित व शुद्ध पाणी पोहोचवणे हे शासनाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने काम करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, नळजोडण्यांची संख्या वाढवावी तसेच वितरण प्रणालीचे 'हायड्रोलिक टेस्टिंग' पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जुन्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीच्या रेस्टोरेशनची कामे वेगाने पूर्ण करून खोदलेले रस्ते आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्यास सांगितले. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

बैठकीस सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार डॉ. भागवत कराड तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

योजनेची सद्यस्थिती

२०५२ पर्यंतच्या ६०४ एमएलडी पाणीपुरवठ्याचे नियोजन

५९ पैकी २९ पाण्याच्या टाक्या पूर्ण

१,९११ किमी पैकी १,२९१ किमी पाइपलाइनचे काम पूर्ण

४६,५०० नळजोडण्या देण्यात आल्या