चिमूरच्या करिष्मा मेश्रामची MPSC मध्ये ऐतिहासिक कामगिरी; SC महिला गटात राज्यात प्रथम

चिमूरच्या करिष्मा मेश्रामची MPSC मध्ये ऐतिहासिक कामगिरी; SC महिला गटात राज्यात प्रथम
चिमूरच्या करिष्मा मेश्रामची MPSC मध्ये ऐतिहासिक कामगिरी; SC महिला गटात राज्यात प्रथम

महाराष्ट्र वाणी

चंद्रपूर (प्रतिनिधी) दि ९ :- प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री यांना न जुमानता चिमूर तालुक्यातील वडसी गावच्या करिष्मा अनिरुद्ध मेश्राम हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. अनुसूचित जातीतील महिला प्रवर्गात राज्यात प्रथम क्रमांक मिळवत तिची सहायक वनसंरक्षक पदासाठी निवड झाली आहे.

करिष्माचे वडील अनिरुद्ध मेश्राम हे शेतमजुरीसोबत छोटासा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड केली नाही. शिक्षणाला प्राधान्य देत मुलांना पुढे जाण्यासाठी सातत्याने पाठबळ दिले.

स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुण्यात असताना करिष्माने आर्थिक अडचणींवर मात करत अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. उपलब्ध असलेल्या साधनांचा योग्य वापर करत तिने जुन्या पुस्तकांपासून स्वतः तयार केलेल्या नोट्सपर्यंत प्रत्येक गोष्टीचा अभ्यासासाठी उपयोग केला. सातत्य, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने MPSC परीक्षेत राज्यस्तरीय यश मिळवले.

करिष्माच्या कुटुंबात स्पर्धा परीक्षेच्या यशाची ही पहिलीच कहाणी नाही. तिचा भाऊ उमेश मेश्राम यानेही यापूर्वी MPSC परीक्षा उत्तीर्ण करून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पद मिळवले आहे. त्यामुळे दोन्ही भावंडांनी स्पर्धा परीक्षेत मिळवलेले यश कुटुंबासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

करिष्माच्या या यशामागे तिच्या आई-वडिलांचे कष्ट, कुटुंबाचा विश्वास आणि तिची स्वतःची जिद्द आहे. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी तिची यशोगाथा निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.