घाटीतील प्रलंबित जन्म प्रमाणपत्रांचा तातडीने निपटारा करा!AIMIM युवा टीमची अधिष्ठाता शिवाजी सुर्के यांच्याकडे मागणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- घाटी रुग्णालयातील जन्म प्रमाणपत्रांसाठी अर्ज करूनही अनेक नागरिकांना महिनोन्महिने, तर काही नागरिकांना तब्बल एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत असल्याचा मुद्दा उपस्थित करत AIMIM (All India Majlis-E-Ittehadul Muslimeen) युवा टीमच्या वतीने घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुर्के यांच्याकडे दिनांक 15 ला निवेदनाद्वारे तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करूनही जन्म प्रमाणपत्र मिळण्यासाठी नागरिकांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांना विविध शासकीय व वैयक्तिक कामांमध्ये अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
“प्रशासनाच्या दिरंगाईची शिक्षा नागरिकांना का?” असा सवाल उपस्थित करत प्रलंबित अर्जांचा तातडीने निपटारा करण्याची मागणी करण्यात आली.
नागरिकांना सरकारी सेवा निर्धारित कालमर्यादेत मिळणे हा त्यांचा अधिकार असून, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम (RTS Act), 2015 अंतर्गत सेवांच्या वेळेत उपलब्धतेवर भर देण्यात आला आहे. त्यामुळे एक वर्ष, दीड वर्ष किंवा त्याहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या जन्म प्रमाणपत्रांच्या अर्जांसाठी विशेष मोहीम राबवून प्रमाणपत्रे तातडीने वितरित करावीत, अशी मागणी AIMIM युवा टीमने केली.
नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित या प्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. नागरिकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी अकीब पटेल – युवा शहराध्यक्ष, शेख तौफीक – युवा माजी विधानसभा अध्यक्ष, ॲड. समी अली खान – जिल्हा कार्याध्यक्ष, विद्यार्थी आघाडी, विखार खान – जिल्हा महासचिव, शारेक काजी – युवा शहर उपाध्यक्ष, शेख जमीर – बॉंड आदी उपस्थित होते.
— महाराष्ट्र वाणी
सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित