गंगापूरमध्ये महाविकास आघाडीचा एल्गार; शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन

गंगापूरमध्ये महाविकास आघाडीचा एल्गार; शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन
गंगापूरमध्ये महाविकास आघाडीचा एल्गार; शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी तीव्र आंदोलन

महाराष्ट्र वाणी

गंगापूर (प्रतिनिधी) दि २ :- शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी गंगापूर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या निदर्शनात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकार व प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली.

आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

प्रमुख मागण्या अशा

शेतमालाला उत्पादन खर्चावर किमान ५० टक्क्यांहून अधिक हमीभाव देण्यात यावा.

कृषी क्षेत्राशी संबंधित VAT आणि इतर करांमध्ये सवलत द्यावी.

ग्रामीण भागात दररोज किमान १२ तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करावा.

सौर ऊर्जा जोडणीच्या प्रलंबित प्रस्तावांना गती देण्यात यावी.

पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील रस्ते, पूल आणि अन्य विकासकामे पूर्ण करावीत.

विद्यार्थ्यांचा प्रलंबित वसतिगृह निर्वाह भत्ता तातडीने वितरित करावा.

पीक कर्ज मंजुरीसाठी लागू करण्यात आलेली ‘सिबिल स्कोअर’ची अट रद्द करावी.

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामीण जनतेच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. प्रशासनाने या मागण्यांवर त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आगामी काळात आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह माजी लोकप्रतिनिधी, विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती

किरण डोंगगावकर, अंकुशराव सुंब, विश्वजित चव्हाण, सूर्यकांत गरड, अविनाश पाटील, सूर्यकांत थोरात यांच्यासह मोहसिनभाई चाऊस, काशिनाथ धरपळे, सुभाष कानडे, मधुकर चव्हाण, संतोष काटकर, नानासाहेब वाघ, शेषराव थोरात, बद्रीनाथ बारहाते आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदविला.

👉 प्रशासनाने मागण्यांवर काय निर्णय घेतला आणि आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असणार, याकडे आता गंगापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.