"‘खान पाहिजे की बाण?’ ते ‘खानच्या हातातच बाण’; मराठवाड्याच्या राजकारणात काळाने फिरवलेले चक्र!"

"‘खान पाहिजे की बाण?’ ते ‘खानच्या हातातच बाण’; मराठवाड्याच्या राजकारणात काळाने फिरवलेले चक्र!"
"‘खान पाहिजे की बाण?’ ते ‘खानच्या हातातच बाण’; मराठवाड्याच्या राजकारणात काळाने फिरवलेले चक्र!"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २ :- राजकारणात कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात, फक्त परिस्थिती आणि समीकरणे बदलत असतात, याची प्रचिती पुन्हा एकदा परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे.

एक काळ असा होता की मराठवाड्यात कोणतीही निवडणूक आली की औरंगाबाद (सध्याचे छत्रपती संभाजीनगर) शहरात एक घोषणा मोठ्या प्रमाणावर गाजायची – "खान पाहिजे की बाण?". त्या घोषणेत राजकीय संघर्ष, धार्मिक ध्रुवीकरण आणि निवडणुकीतील वातावरणाचे प्रतिबिंब दिसायचे.

मात्र काळ बदलला, राजकीय समीकरणे बदलली आणि आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की ज्या "खान" विरुद्ध कधीकाळी "बाण" हे प्रतीक उभे केले जायचे, त्याच "खान" यांच्या हातात आज शिवसेनेचा "बाण" सोपविण्यात आला आहे.

परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेने पक्षाचे महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष सईद खान यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे, त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट स्वतः उपस्थित होते. त्यामुळे या उमेदवारीची आणि त्यामागील राजकीय संदेशाची राज्यभर चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाची प्रतिमा आणि त्याची पारंपरिक भूमिका पाहता, अल्पसंख्याक समाजातील एका नेत्याला विधान परिषदेसाठी उमेदवारी देणे हा पक्षाच्या बदलत्या राजकीय धोरणाचा भाग मानला जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजात आपली पकड मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

राजकारणात कालपरत्वे बदलणारी समीकरणे, बदलणारे मित्र-शत्रू आणि नव्या वास्तवाशी जुळवून घेणारे पक्ष याचे हे एक बोलके उदाहरण मानले जात आहे. त्यामुळे अनेक जुन्या राजकीय कार्यकर्त्यांना आणि मतदारांना "खान पाहिजे की बाण?" या घोषणेची आठवण होत असून, आज मात्र "खानच्या हातातच बाण" दिसत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

खरंच, राजकारणात काहीही कायम नसते. म्हणूनच म्हणतात...

"बदलाव ही संसार का नियम है!"

अशाच राजकीय घडामोडींचे विश्लेषण आणि ताज्या अपडेट्ससाठी वाचत रहा — महाराष्ट्र वाणी.