“काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी चुरस वाढली; नवीन चेहऱ्याला संधी की जुन्यांवरच विश्वास?”

“काँग्रेसच्या शहराध्यक्षपदासाठी चुरस वाढली; नवीन चेहऱ्याला संधी की जुन्यांवरच विश्वास?”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.९ :- शहरात काँग्रेसला पुन्हा बळकटी देण्यासाठी आणि पूर्वीचे स्थान मिळवण्यासाठी पक्षाकडून हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात ‘सृजन अभियान’ राबवले जात असून, त्याअंतर्गत जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष तसेच विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पर्यवेक्षक विवेक बन्सल यांनी शहरात मुक्काम ठोकत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. बैठकींमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी नव्या नेतृत्वाची गरज व्यक्त करत उच्च शिक्षित आणि सक्रिय कार्यकर्ते डॉ. सरताज पठाण यांना शहराध्यक्षपदासाठी पुढे करण्याची मागणी केली आहे.

डॉ. पठाण यांचे कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसशी निष्ठेने जोडलेले आहे. सध्या ते प्रदेश सचिव पदाची जबाबदारी सांभाळत असून, पक्ष संघटन आणि सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे कार्यकर्त्यांचे मत आहे. तसेच ते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे विश्वासू मानले जातात.

दुसरीकडे, विद्यमान शहराध्यक्ष युसूफ शेख यांनी कठीण काळात पक्षाची जबाबदारी सांभाळत विविध आंदोलनांमध्ये नेतृत्व केल्यामुळे त्यांनाही पुन्हा संधी द्यावी, अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी केली आहे.

याशिवाय माजी शहराध्यक्ष इब्राहीम पठाण आणि सय्यद अक्रम यांनीही शहराध्यक्षपदासाठी इच्छुकता दर्शवली असल्याची माहिती पुढे येत आहे.

सृजन अभियानांतर्गत 21 एप्रिलपर्यंत सर्व अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर होणार असून, त्यानंतर शहराध्यक्षपदासाठी अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.

“आता नजर 21 एप्रिलकडे — काँग्रेसमध्ये बदलाची नांदी की जुनेच चेहरे कायम?”