कर थकबाकीदारांवर आयुक्त अमोल येडगे यांचा दणका; तब्बल २१ दुकाने सील! झोन ८ मध्ये सर्वाधिक १२ व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई

कर थकबाकीदारांवर आयुक्त अमोल येडगे यांचा दणका; तब्बल २१ दुकाने सील! झोन ८ मध्ये सर्वाधिक १२ व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई
कर थकबाकीदारांवर आयुक्त अमोल येडगे यांचा दणका; तब्बल २१ दुकाने सील! झोन ८ मध्ये सर्वाधिक १२ व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ४ :- मालमत्ता कर थकविणाऱ्या व्यावसायिक मालमत्ताधारकांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने सलग दुसऱ्या दिवशीही धडक जप्ती मोहीम राबविली. शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) शहरातील विविध झोनमध्ये कारवाई करत एकूण २१ दुकाने व मालमत्ता सील करण्यात आल्या. यामध्ये झोन क्रमांक ८ मध्ये सर्वाधिक १२ व्यावसायिक दुकाने सील करून मोठी कारवाई करण्यात आली.

दि. ३ सप्टेंबर रोजी मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी मालमत्ताधारकांना थकीत मालमत्ता कर तातडीने भरून अप्रिय कारवाई टाळण्याचे आवाहन केले होते. थकबाकीदारांनी कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला होता.

त्यानंतर शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त तथा कर निर्धारक व संकलक विकास नवाळे यांनी सर्व झोन कार्यालयांतील कर वसुली पथकांना थकबाकीदारांच्या याद्या देऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

या मोहिमेत झोन ८ कार्यालयाने सर्वाधिक १२ व्यावसायिक दुकाने सील केली. सहाय्यक आयुक्त भारत बिरारे यांच्या पथकाने आमदार रोड व सातारा परिसरातील मालमत्ता कर थकविणाऱ्या १२ दुकानांवर सीलची कारवाई केली.

इतर झोनमध्येही कारवाईची मोहीम सुरू राहिली. झोन १ मध्ये दोन मालमत्ता सील करून १.४२ लाख रुपये, तर झोन ५ मध्ये एका मालमत्तेवर कारवाई करून ८.१७ लाख रुपयांचा कर वसूल करण्यात आला. झोन ६ मध्ये दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. झोन ७ मध्ये तीन मालमत्तांवर कारवाई करण्यात आली असून एका मालमत्तेकडून १.६३ लाख रुपये वसूल करण्यात आले.

झोन ९ मध्ये एका मालमत्तेवर सीलची कारवाई करून २ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. झोन १० मधील तीन मालमत्तांकडून १.७० लाख रुपये कर वसूल करण्यात आला.

दरम्यान, थकीत मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय सील करण्यात आलेली मालमत्ता खुली केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्त अमोल येडगे यांनी दिला आहे. शहरातील सर्व थकबाकीदार मालमत्ताधारकांनी तातडीने थकीत कर भरून जप्ती व सीलची कारवाई टाळावी, असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.