एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे; महिला-ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

एसटी प्रवाशांना मोठा दिलासा! NCMC कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे; महिला-ज्येष्ठ नागरिकांना दिलासा

मुंबई दि १६ :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ सप्टेंबर २०२६ पासून लागू करण्यात आलेल्या NCMC (National Common Mobility Card) कार्डाच्या अनिवार्यतेला आता ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला प्रवाशांसह ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC कार्डच्या माध्यमातून सवलतीचे तिकीट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, कार्ड वितरण आणि वापराच्या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने अनेक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता.

सर्व्हरवरील ताणामुळे अडचणी

NCMC कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवर मोठ्या प्रमाणात भार येत असल्याने काही ठिकाणी कार्ड सक्रिय करणे, कार्ड रीड होणे किंवा तिकीट काढताना अडथळे निर्माण होत आहेत. या संदर्भात प्रवाशांकडून एसटी महामंडळाकडे तक्रारीही करण्यात आल्या होत्या.

या अडचणींची दखल घेत NCMC कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना संबंधित एसटी आगारांना देण्यात आल्या आहेत.

कार्ड सक्रिय असेल तर NCMC द्वारेच सवलत

ज्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांचे NCMC कार्ड आधीच सक्रिय झाले आहे, त्यांनी सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्डच वापरणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, कार्ड रीड होत नसल्यास किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे NCMC कार्डद्वारे सवलतीचे तिकीट देणे शक्य न झाल्यास, अशा प्रवाशांना पूर्वीच्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याची मुभा देण्यात आली आहे.

त्यामुळे NCMC कार्ड घेण्याच्या प्रक्रियेत किंवा कार्ड वापरताना अडचणी येणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित