"उद्योग सुरक्षेसाठी ग्रामीण पोलिसांची नवी रणनीती; शेंद्रा औद्योगिक क्षेत्राला स्वतंत्र पोलीस ठाण्याचे संकेत"
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद), दि. ४ :- शेंद्रा, बिडकीन आणि करमाड औद्योगिक पट्ट्यातील उद्योगांची सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामीण पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. उद्योग क्षेत्रातील वाढत्या गरजा आणि सुरक्षाविषयक बाबींवर लक्ष केंद्रित करत ‘उद्योग–पोलीस समन्वय’ बैठकीचे आयोजन करण्यात आले.
बैठकीदरम्यान प्रकाश जाधव यांनी उद्योग क्षेत्रासाठी प्रतिबंधात्मक पोलिसिंगचे महत्त्व अधोरेखित केले. उद्योग आणि पोलिस प्रशासनामध्ये सातत्यपूर्ण संवाद राहिल्यास सुरक्षा व्यवस्थेत अधिक सुधारणा करता येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
औद्योगिक परिसरातील वाहतूक व्यवस्थापन, सीसीटीव्ही आणि RFID आधारित सुरक्षा प्रणाली, कामगारांची पडताळणी, महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना, सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता आणि अतिक्रमणांविरोधात संयुक्त कारवाई यासारख्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यासाठी विशेष कृती आराखड्याची तयारी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी शेंद्रा औद्योगिक क्षेत्रासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे उभारण्याच्या प्रस्तावालाही गती देण्याचे संकेत देण्यात आले. बैठकीला १०० हून अधिक उद्योग प्रतिनिधी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योगांच्या वाढत्या विस्तारासोबत सुरक्षा व्यवस्थाही अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
उद्योग आणि पोलिसांचा समन्वय वाढल्यास सुरक्षेच्या नव्या मॉडेलची सुरुवात होणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.