माहीन मुलतानी यांची मोठी मागणी; अजिंठा लेणीच्या महसुलातील २०% निधी फर्दापूरला द्या

माहीन मुलतानी यांची मोठी मागणी; अजिंठा लेणीच्या महसुलातील २०% निधी फर्दापूरला द्या

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) (प्रतिनिधी) दि २ :- जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. पर्यटकांकडून तिकीटांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होत असला, तरी या उत्पन्नाचा लाभ स्थानिक पातळीवर होत नसल्याचा मुद्दा आता पुढे आला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत फर्दापूर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या माहीन इद्रिस मुलतानी यांनी हा विषय उपस्थित केला. अजिंठा लेणीमधून मिळणाऱ्या एकूण महसुलापैकी २० टक्के रक्कम फर्दापूर ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावी, अशी त्यांनी ठाम मागणी केली.

यावेळी त्यांनी पर्यटन विभागाकडून उभारण्यात आलेल्या विविध इमारतींच्या घरपट्टीचा लाभही ग्रामपंचायतीला मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. पर्यटनस्थळातून मोठ्या प्रमाणात महसूल निर्माण होत असताना स्थानिक गावाच्या विकासासाठी निधी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या मागणीबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षांनी बैठकीदरम्यान दिली. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास फर्दापूर गावातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि इतर विकासकामांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 अजिंठा लेणीचा महसूल स्थानिक विकासासाठी वापरला जाणार का? याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.