आदर्श पतसंस्थेच्या ठेवीदारांसाठी इम्तियाज जलील आक्रमक; १ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २६ :- आदर्श पतसंस्थेतील ५० हजार रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या नागरिकांचे पैसे गेल्या तीन वर्षांपासून अडकून असल्याने या प्रश्नावर आता माजी खासदार Imtiaz Jaleel यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठेवीदारांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
यावेळी त्यांनी भगवी शाल आणि भगवी टोपी परिधान करत ठेवीदारांच्या न्यायासाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रकरणातील कारवाईला गती मिळावी आणि ठेवीदारांना न्याय मिळावा, यासाठी येत्या १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली.
या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात व्हावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षांत अनेक ठेवीदारांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगत, सुमारे ७५ ठेवीदारांच्या मृत्यूसाठी प्रशासनाच्या निष्क्रियतेला जबाबदार धरत गंभीर आरोप करण्यात आले.
यासोबतच प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा संबंधित मंत्र्यांना घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला. यावेळी खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यावरही टीका करत सर्वांसाठी समान न्यायाची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — तुमच्या हक्काच्या बातम्या, सर्वात आधी!