औषधी भवन नाल्याच्या समस्येची मनपाकडून गंभीर दखल; महापौर, सभापती व आयुक्तांची संयुक्त पाहणी

औषधी भवन नाल्याच्या समस्येची मनपाकडून गंभीर दखल; महापौर, सभापती व आयुक्तांची संयुक्त पाहणी
औषधी भवन नाल्याच्या समस्येची मनपाकडून गंभीर दखल; महापौर, सभापती व आयुक्तांची संयुक्त पाहणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) , दि. २६ :- शहरातील औषधी भवन लगतच्या नाल्याच्या समस्येची गंभीर दखल घेत महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरीये आणि मनपा आयुक्त तथा प्रशासक अमोल येडगे यांनी आज संबंधित परिसराची संयुक्त पाहणी केली.

स्थायी समिती सभापती अनिल मकरीये यांनी या समस्येकडे लक्ष वेधल्यानंतर ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान औषधी भवन इमारतीची उंची कमी असल्यामुळे नाल्याच्या साफसफाईच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. नाल्यात जेसीबी यंत्र उतरविण्यास पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने नियमित साफसफाई करणे कठीण होत असल्याचे स्पष्ट झाले.

याशिवाय, या नाल्यात जवळपास २५० घरांचे सांडपाणी सोडले जात असल्याने नुकत्याच झालेल्या पावसात नाल्याचे पाणी अनेक घरांमध्ये शिरून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची माहिती देण्यात आली. यावर संबंधित घरांचे ड्रेनेज मुख्य ड्रेनेज लाईनला जोडण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

तसेच परिसरातील नाल्यात प्लास्टिक व थर्माकोल जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी बॅरियर उभारण्याचे निर्देशही देण्यात आले. औषधी भवन इमारतीची लीज मुदत संपली आहे की नाही याची तातडीने तपासणी करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त अमोल येडगे यांनी दिले. समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तत्काळ पावले उचलावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नाल्याच्या समस्येवर मनपाची हालचाल सुरू झाली असली, तरी नागरिकांना कायमस्वरूपी दिलासा कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.