आंबीखालसाच्या पल्लवी कान्होरे यांचे उल्लेखनीय यश; MPSC मधून मुद्रांक शुल्क अधिकारी व राज्य कर निरीक्षकपदी निवड

आंबीखालसाच्या पल्लवी कान्होरे यांचे उल्लेखनीय यश; MPSC मधून मुद्रांक शुल्क अधिकारी व राज्य कर निरीक्षकपदी निवड

संगमनेर (प्रतिनिधी) दि १८ :- प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगून तब्बल पाच वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आंबीखालसा (ता. संगमनेर) येथील पल्लवी दत्तू कान्होरे यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेतून त्यांची मुद्रांक शुल्क अधिकारी तसेच राज्य कर निरीक्षक या दोन पदांसाठी निवड झाली आहे.

पल्लवी कान्होरे यांनी डी. वाय. पाटील महाविद्यालयातून कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी घेतली. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.

स्पर्धा परीक्षेच्या प्रवासात त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. तब्बल तीन वेळा त्या मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्या, मात्र काही गुणांच्या फरकाने अंतिम यश मिळू शकले नाही. या अपयशामुळे खचून न जाता त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम ठेवले आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल सुरूच ठेवली.

अखेर त्यांच्या मेहनतीला यशाची साथ मिळाली. MPSC परीक्षेच्या माध्यमातून त्यांची एकाच वेळी दोन महत्त्वाच्या पदांसाठी निवड झाली. या यशामध्ये आई-वडिलांनी दिलेला विश्वास, प्रोत्साहन आणि सातत्यपूर्ण पाठिंबा महत्त्वाचा ठरल्याचे पल्लवी यांनी सांगितले.

प्रगतिशील शेतकरी दत्तू कान्होरे यांच्या कन्या असलेल्या पल्लवी यांच्या या यशाचे त्यांच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

विद्यार्थ्यांना संदेश देताना पल्लवी कान्होरे म्हणाल्या की, स्वतःच्या ध्येयावर विश्वास ठेवून ते पूर्ण होईपर्यंत प्रयत्न करत राहणे गरजेचे आहे. परिस्थिती प्रतिकूल असली किंवा अपयश आले तरी त्यातून शिकत पुढे जात राहिले पाहिजे. यश मिळण्यास वेळ लागला तरी प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करत राहणे महत्त्वाचे आहे.

पल्लवी कान्होरे यांचा हा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिद्द, संयम आणि सातत्याचे उदाहरण ठरला आहे. त्यांच्या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 महाराष्ट्र वाणी सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित