अल्पसंख्यांक प्रश्नांवर ट्रायडेंटमध्ये उच्चस्तरीय बैठक; मंत्री कोकाटे यांचे तातडीने उपाययोजनांचे आश्वासन
आझमींच्या पुढाकारातून बैठक यशस्वी; मार्टी कृती समितीचा मोलाचा वाटा
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि ४ :- महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध प्रश्नांवर आणि त्यावरील संभाव्य उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आज हॉटेल ट्रायडेंट, मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अल्पसंख्यांक विकास मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आसीम आझमी तसेच मार्टी कृती समिती तर्फे सीनियर रिसर्च स्कॉलर शहेबाज मनियार उपस्थित होते.
बैठकीत अल्पसंख्यांक समुदायाच्या शिक्षण, रोजगार, आरक्षण, सामाजिक न्याय या प्रमुख समस्या प्राधान्याने चर्चेत आल्या. मंत्री कोकाटे यांनी सर्व मुद्द्यांचे बारकाईने ऐकून घेतले आणि तातडीने सकारात्मक कृती करावी तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत, असे स्पष्ट केले. यामुळे अल्पसंख्यांक समाजात या बैठकीनंतर मोठी आशा निर्माण झाली आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीचे श्रेय आमदार अबू आसीम आझमी यांना जाते. त्यांच्या पुढाकारातून ही बैठक शक्य झाली. त्याचबरोबर मार्टी कृती समितीचे ॲड. अझर पठाण, ॲड. शहेबाझ पठाण, ॲड. वसीम कुरेशी आणि नबील उझ जमा हे सातत्याने विविध व्यासपीठांवरून अल्पसंख्यांक समाजाचे प्रश्न पुढे नेत आहेत. त्यांचा या बैठकीच्या आयोजनात मोलाचा वाटा आहे.
या बैठकीमुळे महाराष्ट्रातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नवीन दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
"ही बैठक केवळ चर्चा न ठरता, खऱ्या बदलाची सुरुवात व्हावी, हीच समाजाची अपेक्षा आहे."