अब्दुल समीर यांचा अर्ज बाद; ‘अपीलमध्ये १०० टक्के न्याय मिळेल’ – अब्दुल सत्तार

अब्दुल समीर यांचा अर्ज बाद; ‘अपीलमध्ये १०० टक्के न्याय मिळेल’ – अब्दुल सत्तार
अब्दुल समीर यांचा अर्ज बाद; ‘अपीलमध्ये १०० टक्के न्याय मिळेल’ – अब्दुल सत्तार

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना अब्दुल सत्तार यांनी अर्ज फेटाळण्यामागील कारणे "हास्यास्पद" असल्याचा आरोप केला असून अपीलमध्ये आपल्याला निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

समीर सत्तार यांच्यासह कन्नडच्या आमदार संजना जाधव यांचाही अर्ज बाद झाल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत विविध तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज एकामागोमाग बाद होत असल्याने यामागे राजकीय हेतू तर नाही ना, अशी चर्चा देखील सुरू आहे.

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, समीर सत्तार हे अद्याप जिल्हा बँकेचे संचालक किंवा सदस्य नसल्याने संबंधित नियम त्यांना लागू होत नाही. त्यामुळे त्या नियमाच्या आधारे उमेदवारी अर्ज बाद करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. सोयगाव येथील इमारतीबाबत बँकेला नोटीस देण्यात आली होती, मात्र शेतकरी कर्जमाफी व कर्जवाटप यांसारखी महत्त्वाची कामे सुरू असल्याने शाखेचे तत्काळ स्थलांतर शक्य नसल्याचे बँकेने प्रशासनाला कळवले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या निर्णयाविरोधात अपील करण्यात येणार असून त्यानंतर समीर सत्तार यांचा अर्ज स्वीकारला जाईल, असा शंभर टक्के विश्वास असल्याचे सत्तार यांनी सांगितले. या प्रकरणामागे राजकीय हस्तक्षेप आहे का, या प्रश्नावर मात्र त्यांनी सध्या भाष्य करण्याचे टाळले.

दरम्यान, जिल्हा बँकेची निवडणूक महायुतीने एकत्रितपणे लढवावी, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे सत्तार यांनी सांगितले. त्यामुळे सर्व परिस्थितीचा सखोल अभ्यास करून पुढील राजकीय भूमिका निश्चित केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — जिल्हा बँक निवडणुकीतील प्रत्येक घडामोडीचा सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह अपडेट!