अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबत खुली चर्चा
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड दि २७ :- अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आजाद समाज पार्टी आणि नागरी मूलभूत हक्क अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी खुली चर्चा केली.
आमदार अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी ही बैठक पार पडली. आजाद समाज पार्टी व नागरी मूलभूत हक्क अभियानाचे अध्यक्ष प्रा. सुनील वाकेकर यांनी आमदारांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आमदार सत्तार यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रित केले.
बैठकीत अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरण, त्याचा समाजातील विविध घटकांवर होणारा परिणाम तसेच या विषयावरील संबंधितांची भूमिका याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी आपापली मते आमदार अब्दुल सत्तार यांच्यासमोर मांडली.
या चर्चेत आजाद समाज पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मराठवाडा प्रभारी अरविंद कांबळे, नागरी मूलभूत हक्क अभियानाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर, प्रदेश सचिव काशिनाथ भांडेगावकर, मराठवाडा अध्यक्ष शिवाजी वीर, मराठवाडा कार्याध्यक्ष पॅंथर तातेराव ससाने, जिल्हा प्रभारी राहुल साबळे, जिल्हाध्यक्ष विजय शिनगारे, नेते प्रभाकर पारदे, कुडूबा जगताप, गुणरत्न सोनवणे, राजेश भारसाकळे, मुजीब मुलतानी, आक्रम शेख आणि अमरदीप हिवराळे आदी उपस्थित होते.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर पुढील काळातही चर्चा आणि भूमिका स्पष्ट करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण ठरली.