अटक वॉरंटमधून वाचवण्यासाठी ५ हजारांची लाच; तडजोडीनंतर ३ हजार घेताना पोलीस हेड कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ११ :- अटक वॉरंटची कारवाई न करता मदत करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या गंगापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबलला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून रंगेहात पकडले. शकील सत्तार शेख (वय ४२) असे ताब्यात घेण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
एसीबीकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदाराच्या नावाने अटक वॉरंट असल्याने त्याच्यावर अटक कारवाई होऊ नये आणि या प्रकरणात मदत करावी, यासाठी शकील शेख यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
या तक्रारीची १० सप्टेंबर २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यावेळी पंचांसमक्ष झालेल्या चर्चेत आरोपी हेड कॉन्स्टेबलने अटक वॉरंटची कारवाई न करण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन ३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद आहे.
त्यानंतर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना शकील शेख यांना गंगापूर पोलीस ठाण्यातील एका कक्षात पंचांसमक्ष ताब्यात घेण्यात आले. लाचेच्या रकमेसह त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अन्वये गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू होती.
ही कारवाई राजू बी. नांगलोत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून बाळासाहेब शिंदे, पोलीस उपअधीक्षक यांनी काम पाहिले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
नागरिकांना एसीबीचे आवाहन
कोणताही लोकसेवक शासकीय कामासाठी लाच मागत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयाशी 0240-2344050, व्हॉट्सॲप 7720891064 किंवा टोल फ्री 1064 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.