“७ हजारांची मागणी, ५ हजारात सौदा; सिल्लोडचा तलाठी ACB च्या जाळ्यात!”
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड, दि. ९ : जमीनीचा फेरफार मंजूर करून सातबाऱ्यावर नाव नोंदवून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याला दिनांक 8 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले. प्रशांत रमेश देवगया (वय ३४), तलाठी, सजा केळगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारदाराने त्यांच्या पत्नीच्या नावे केळगाव येथील गट क्रमांक ५५१ मधील एक गुंठा जमीन खरेदी केली होती. या जमिनीचा फेरफार मंजूर करून सातबाऱ्यावर नाव नोंदवून देण्यासाठी आरोपी तलाठ्याने सुरुवातीला ७ हजार रुपयांची लाच मागितली.
यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली. सापळा रचून पंचांसमक्ष तडजोडीनंतर आरोपीने ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्याला रंगेहात पकडले. अंगझडतीत लाचेची रक्कम, स्वतःचे ४०० रुपये व मोबाईल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू असून घरझडतीची प्रक्रिया देखील सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक केशव नाना दिंडे, पोलिस उपअधीक्षक राजीव तळेकर आणि तपास अधिकारी शांतीलाल चव्हाण यांच्या पथकाने केली.
👉 “लाचखोरीवर ACB चा आणखी एक घाव; भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाईचा धडाका कायम!”