“२७३+ मतदारांचा विश्वास माझी ताकद; लढा थांबलेला नाही!” – अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांचा निर्धार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २८ :- महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९ (अ) मधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांनी शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा, पाणीपुरवठा आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांवर प्रस्थापित राजकारणाविरुद्ध आपला लढा उभारला होता. या निवडणुकीत त्यांना मिळालेल्या २७३ पेक्षा अधिक मतांबद्दल त्यांनी मतदारांचे मनापासून आभार मानले आहेत.
त्रिभुवन यांनी सांगितले की, निवडणूक ही केवळ विजय-पराजयाची लढाई नसून समाजातील प्रश्नांवर आवाज उठवण्याचे व्यासपीठ आहे. प्रभागातील अनेक नागरिकांनी बदलाच्या अपेक्षेने त्यांना मतदान केले. कमीत कमी २७३ मतदारांना तरी असे वाटले की, “आपला नगरसेवक शिक्षित, प्रामाणिक आणि जनतेसाठी लढणारा असावा.” हीच भावना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, शहरातील शिक्षण, आरोग्य सुविधा, महिलांची सुरक्षितता, स्वच्छ पाणी आणि चांगले रस्ते हे विषय अजूनही गंभीर आहेत. या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत राहणार असून जनतेच्या हक्कासाठी संघर्ष थांबवणार नाही. “शिक्षित युवकांनी राजकारणात पुढे आले पाहिजे, तेव्हाच व्यवस्थेत खरा बदल घडू शकतो,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
निवडणूक संपली असली तरी आपला सामाजिक आणि राजकीय प्रवास थांबलेला नाही, असा ठाम संदेश देत त्यांनी स्पष्ट केले की, “माझी कहाणी अजून संपलेली नाही… मी पुन्हा उभा राहीन, पुन्हा येईन.”
— वाचत रहा, कारण बदलाची सुरुवात अनेकदा छोट्या पावलांपासूनच होते!