फुलंब्रीत ५८३ मुस्लिम मतदारांना यादीतून वगळण्याचा कथित डाव! बनावट फॉर्म-७ दाखल केल्याचा आरोप; नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरेंची तहसीलदारांकडे तक्रार
दोषींवर लोकप्रतिनिधित्व अधिनियम व BNS अंतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी; SIR प्रक्रियेत खळबळ
फुलंब्री, (प्रतिनिधी) दि ३ :- मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेदरम्यान फुलंब्री विधानसभा मतदारसंघात गंभीर प्रकार उघडकीस आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फुलंब्री शहरातील तब्बल ५८३ मुस्लिम मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यासाठी खोटी माहिती देऊन बनावट फॉर्म क्रमांक ७ दाखल करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे फुलंब्री नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
५८३ मतदारांच्या नावांवर आक्षेप; एकाच समाजाला लक्ष्य केल्याचा आरोप
फुलंब्री शहरातील प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही व्यक्तींनी मोठ्या प्रमाणावर आक्षेप नोंदविल्याचे समोर आले आहे. ठोंबरे यांच्या तक्रारीनुसार, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, बीएलए तसेच आजी-माजी नगरसेवकांचा समावेश असलेल्या आक्षेपकर्त्यांनी संगनमत करून शहरात पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असलेल्या ५८३ मुस्लिम नागरिकांच्या विरोधात फॉर्म क्रमांक ७ दाखल केले आहेत.
संबंधित मतदार शहरात राहत नाहीत किंवा त्यांनी अन्यत्र स्थलांतर केले आहे, अशा स्वरूपाची माहिती अर्जांमध्ये देण्यात आल्याचा आरोप आहे. प्रत्यक्षात हे नागरिक फुलंब्रीतच वास्तव्यास असून त्यांना मतदार यादीतून वगळण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक खोटी माहिती देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मतदानाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न?
मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी दाखल करण्यात येणाऱ्या फॉर्म क्रमांक ७ मध्ये खोटी माहिती किंवा खोटी घोषणा देणे हा गंभीर प्रकार असून, लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील कलम ३१ नुसार अशा कृत्याला कायदेशीर शिक्षा होऊ शकते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
केवळ एका विशिष्ट समाजातील नागरिकांना लक्ष्य करून अशा प्रकारे आक्षेप दाखल करण्यात आले असतील, तर हा लोकशाही प्रक्रियेवरील गंभीर आघात ठरू शकतो. नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक अधिकार अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ठोंबरे यांनी म्हटले आहे.
तहसीलदारांकडे लेखी तक्रार; कठोर कारवाईची मागणी
या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, संबंधित फॉर्म क्रमांक ७ ची पडताळणी करावी, खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित करावी आणि दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३१ तसेच लागू भारतीय न्याय संहिता (BNS) मधील तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नगराध्यक्ष राजेंद्र गंगाधर ठोंबरे यांनी केली आहे.
दरम्यान, ५८३ मतदारांच्या नावांबाबत करण्यात आलेल्या या आरोपामुळे फुलंब्रीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रशासन या तक्रारीची कशी दखल घेते, चौकशीत नेमके काय समोर येते आणि संबंधित मतदारांची नावे सुरक्षित राहतात का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे
महाराष्ट्र वाणी | सत्यासाठी निर्भीड, जनतेसाठी समर्पित