हज हाऊसमध्ये वक्फ मंडळ कार्यालय स्थलांतराला काँग्रेसचा विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

हज हाऊसमध्ये वक्फ मंडळ कार्यालय स्थलांतराला काँग्रेसचा विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा
हज हाऊसमध्ये वक्फ मंडळ कार्यालय स्थलांतराला काँग्रेसचा विरोध; निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २० :- हज हाऊसमध्ये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि हज हाऊसची जागा हज कार्यासाठीच राखीव ठेवावी, अशी मागणी शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात दिनांक 19 रोजी निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, हज हाऊस ही वास्तू प्रामुख्याने हज यात्रेकरूंना सेवा, मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि हजसंबंधित प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात आली आहे. दरवर्षी हजारो हज यात्रेकरू विविध कामांसाठी येथे येत असतात. आगामी हज प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरू, प्रशिक्षक आणि संबंधित नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढणार असल्याने हज हाऊसची जागा इतर कार्यालयीन वापरासाठी देणे त्याच्या मूळ उद्देशावर परिणाम करणारे ठरू शकते.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासाठी राज्यातील अन्य पर्यायी जागांचा विचार करता येऊ शकतो. त्यामुळे हज यात्रेकरूंना समर्पित असलेल्या हज हाऊसचा वापर करण्याऐवजी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे.

यापूर्वीही काही कार्यालयांना हज हाऊसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र तात्पुरत्या व्यवस्थेचे कायमस्वरूपी स्वरूप निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शासनाने याबाबत स्पष्ट धोरण आणि कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शहर जिल्हाध्यक्ष ॲड. सय्यद अक्रम यांनी सांगितले की, हज हाऊस ही केवळ इमारत नसून लाखो मुस्लिम नागरिकांच्या भावना आणि धार्मिक व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वपूर्ण संस्था आहे. त्यामुळे शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अन्यथा काँग्रेसच्या वतीने लोकशाही मार्गाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येईल.

यावेळी जेष्ठ नेते इब्राहिम पठाण, युवक प्रदेश उपाध्यक्ष आमेर अब्दुल सलीम, इंजि. विशाल बन्सवाल, मोईन कुरेशी, आबेद हुसेन यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

वाचत रहा महाराष्ट्र वाणी — आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी सर्वात आधी!