सुरतहून राज्यात नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अटकेत; अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई

सुरतहून राज्यात नशेच्या गोळ्यांचा पुरवठा करणारा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अटकेत; अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २० :- राज्यातील अवैध ड्रग्स विक्री, वाहतूक आणि तस्करीविरोधात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई करत सुरत, गुजरात येथून नशेच्या गोळ्या व औषधांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला अटक केली आहे.

छावणी आणि बेगमपुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या NDPS कायद्यातील दोन गुन्ह्यांच्या तपासादरम्यान या प्रकरणाचा उलगडा झाला. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी एकूण 19 लाख 53 हजार 298 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात Nitrazepam Tablet I.P. 10 mg च्या 4,400 गोळ्या, तसेच कोडीनयुक्त कफ सिरपच्या 132 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी या प्रकरणात सहा आरोपींना अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान हा साठा सुरतमधून आणल्याचे समोर आल्यानंतर टास्क फोर्सचे पथक गुजरातमध्ये रवाना झाले. सुरत परिसरात तपास करत पोलिसांनी मुनाफ इकबाल शेख (वय 40) याला अटक केली.

विशेष म्हणजे, आरोपी मुनाफ शेख हा अरिहंत फार्मा गुजरात या कंपनीत मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. न्यायालयाने त्याला 25 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योती प्रियासिंग, पोलीस उपमहानिरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक अजित टिके आणि पोलीस उपअधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

अंमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांचा धडाका सुरूच; आणखी कोणती मोठी नावे समोर येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.