"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"ची शपथ घेऊन ११० नवप्रविष्ठ पोलीस शिपाई सेवेत दाखल
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) ११ जून:- पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे नवप्रविष्ठ ११० पोलीस शिपायांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. २०२३-२४ च्या नियमित व अनुकंपा भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या ७५ पुरुष आणि ३५ महिला पोलीस शिपायांनी प्रशिक्षण पूर्ण करून १० जून रोजी सेवेत हजेरी लावली.
या नवप्रविष्ठ शिपायांचे स्वागत आणि मार्गदर्शनाचा कार्यक्रम आज, ११ जून रोजी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आणि अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
प्रशिक्षणार्थींनी नागपूर, लातूर, जालना, सांगली आणि दौंड येथील प्रशिक्षण केंद्रांमध्ये यशस्वीरीत्या अंतिम परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष पोलीस सेवेत रुजू होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
मार्गदर्शन करताना डॉ. राठोड यांनी सांगितले की, “आपण महाराष्ट्र पोलीस दलाचा एक महत्त्वाचा भाग आहात. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे आपले ब्रीदवाक्य फक्त घोषवाक्य नसून, हे आपल्या प्रत्येक कृतीतून उमटायला हवे. उत्तम चारित्र्य, स्वच्छ मनोवृत्ती आणि समाजातील कायदा-सुव्यवस्था राखण्याची जाणीव ही पोलीस सेवेची खरी ओळख आहे.”
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी नवप्रविष्ठ शिपायांना सतत शिकत राहण्याचे आणि समाजातील बदलांशी सजग राहून प्रामाणिकपणे सेवा करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे समारोप करताना अधिकाऱ्यांनी नव्या पिढीच्या या पोलीस शिपायांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.