शास्त्रीनगरातील नव्या रस्त्याची दुर्दशा; पावसाचे पाणी साचून नागरिकांचे हाल
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १६ :- शास्त्रीनगर सोसायटीतील नुकताच काही महिन्यांपूर्वी महानगरपालिकेमार्फत बनवण्यात आलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था समोर आली आहे. किरकोळ पावसाचे पाणी साचून रस्ता नदीसारखा दिसू लागला आहे. यामुळे स्थानिक नागरिक, शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाले असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे.
किड्स प्राइड शाळा व उद्यान यांच्या मधील हा रस्ता अल्पावधीतच उद्ध्वस्त झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. एवढ्या कमी वेळात रस्ता खराब होणे म्हणजे थेट निकृष्ट दर्जाच्या कामकाजाचा पुरावा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरसेवक, अभियंते व कंत्राटदार यांच्या संगनमताने ही परिस्थिती निर्माण झाल्याची शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत :
1. तातडीने सदर रस्त्याची दुरुस्ती करून योग्य पाणी निचरा व्यवस्था करावी.
2. या कामाची चौकशी करून जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कडक कारवाई करावी.
3. पुढील काळात निकृष्ट दर्जाच्या कामांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र समितीद्वारे तपासणीची व्यवस्था करावी.
यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या धनश्री वल्लभ तडवळकर यांनी सांगितले की,
"करदात्यांच्या पैशांचा गैरवापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेशी खेळले जात आहे. आम्ही यापुढे शांत बसणार नाही. तातडीने कारवाई न झाल्यास आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल."
शास्त्रीनगर परिसरातील रहिवासी अनेक दिवसांपासून या समस्येमुळे त्रस्त असून तात्काळ उपाययोजना होण्याची मागणी सातत्याने जोर धरू लागली आहे.