“महानगरपालिका शाळा ‘पहिली पसंती’ बनवूया!” – शिक्षणासाठी भरीव अर्थसंकल्पाची मागणी

“महानगरपालिका शाळा ‘पहिली पसंती’ बनवूया!” – शिक्षणासाठी भरीव अर्थसंकल्पाची मागणी

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)दि ४ :- शहरातील शिक्षण क्षेत्रात मोठा बदल घडवून आणण्यासाठी येणाऱ्या शिक्षण विभागासाठी भरीव आर्थिक तरतूद करावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अझर पठाण यांनी केली आहे. महानगरपालिकेच्या पुढाकारातून ६ शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्नची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर आता या शैक्षणिक परिवर्तनाला अधिक गती देण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम राबविल्यानंतर पालक व विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर पुढील महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

 प्रस्तावित महत्त्वाचे उपक्रम:

बंद पडलेल्या १४ शाळांचे आधुनिक CBSE/ICSE शैक्षणिक केंद्रांमध्ये रूपांतर

दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत ट्युशन फी सहाय्य

११ वी–१२ वी विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य शिक्षण व IIT/JEE/NEET पूर्वतयारी सुविधा

१०७ बालवाडी व प्राथमिक शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षक मदतनीसांची नियुक्ती

Dr. Sarvepalli Radhakrishnan जयंतीनिमित्त “आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार” सुरू करणे

अॅड. अझर पठाण (सचिव, वेलकम शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक संस्था) यांनी सांगितले की, शिक्षणात केलेली गुंतवणूक ही भविष्यासाठीची सर्वात मोठी हमी असते. महानगरपालिकेच्या शाळा आता ‘पर्याय’ नसून ‘पहिली पसंती’ बनत आहेत, हा बदल टिकवण्यासाठी आर्थिक बळ आवश्यक आहे.

शहराच्या शैक्षणिक भवितव्यासाठी हा अर्थसंकल्प निर्णायक ठरणार का, याकडे पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

👉 शिक्षणात आजचा निर्णय, उद्याचा उज्ज्वल मार्ग — आता महापालिकेची परीक्षा!