शेतात वृद्ध महिलेची निर्घृण हत्या; ५ दिवसांत आरोपी जेरबंद!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. २६ :- शेकटा शिवारातील शेतात ७५ वर्षीय महिलेची डोक्यात दगड मारून निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीस अवघ्या पाच दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
काय आहे प्रकरण?
दि. 21 फेब्रुवारी रोजी शेकटा शिवारातील गट नं. 19 मध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
मृत महिला सुंदराबाई नामदेव जाधव (वय 75) या असून, त्यांच्या डोक्यात मोठा दगड मारून अत्यंत निर्दयीपणे खून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. या प्रकरणी करमाड पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 70/2026, कलम 103(1) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे वेगाने फिरली
पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार मे. राठोड व अपर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विजयसिंह राजपूत यांनी तीन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू केला.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी, तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय करण्यात आले.
मेंढपाळाच्या रागातून हत्या
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दारकुबा बालाजी भाऊले (रा. लाडसांवगी) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तो मेंढ्या चारण्यासाठी त्या परिसरात नियमित जात असे. सुंदराबाई जाधव या त्याला वारंवार शेतात मेंढ्या आणू नकोस म्हणून शिवीगाळ करत असल्याने त्याच्या मनात राग होता.
घटनेच्या दिवशी पुन्हा वाद झाल्यानंतर रागाच्या भरात त्याने शेतातील मोठा दगड उचलून त्यांच्या डोक्यात टाकला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो गोलटगाव येथून अटक करण्यात आला.
पुढील तपास सुरू
आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी करमाड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा व करमाड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या सहभाग घेतला.
📰 शेतातील किरकोळ वादातून उफाळलेला राग… आणि एका निरपराध वृद्धेचा जीव गेला! पण पोलिसांच्या चपळ तपासामुळे गुन्हेगार अखेर जाळ्यात — न्याय मिळवून देण्याची हीच खरी लढाई!